सामाजिक संस्थांला मदतीच्या नावाखाली फसवणूक ! आर्मी ग्रुप असल्याची बतावणी ! खदान पोलिसांमध्ये तक्रार

सामाजिक संस्थांला मदतीच्या नावाखाली फसवणूक
— आर्मी ग्रुप असल्याची बतावणी
— खदान पोलिसांमध्ये तक्रार
अकोला : सामाजिक संस्थांना मदत करण्याच्या नावाखाली फसवणूक केली जात असल्याचा प्रकार अकोल्यात उघडकीस आला आहे. आर्मी ग्रूप असल्याची बतावणी करून पैस उकडण्याचा धंदा ही मंडळी सोशल माध्यमातून करीत असल्याने त्यांच्यापासून सावध राहण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

सूर्योदय बालगृह ही संस्था समाजातील उपेक्षित मुलांचे संगोपण करते. या संस्थेचे प्रकल्प संचालक शिवराज नंदकिशोर खंडाळकर पाटील यांना एका व्यक्तीचा फोन आला. आर्मी ग्रूपचा सदस्य प्रवीणकुमार पांडे बोलत असल्याचे सांगून आमचा ग्रूप सामाजिक संस्थांना मदत करतो. तुमच्या संस्थेला मदत करावयाची आहे. तुम्हाला आम्ही कशी मदत करू शकतो, याबाबत विचारणा केली व संस्थेबाबत माहिती घेतली. पाटील यांनी संपूर्ण माहिती दिल्यानंतर त्याच्यावर विश्वास बसल्याने संस्थेला लागणाऱ्या साहित्याची यादी दिली. ती यादी स्वतःचे प्रवीणकुमार पांडे नाव सांगत असलेल्या व्यक्तीने विविध प्रतिष्ठानांना पाठविली. त्यानुसार पाटील संबंधित प्रतिष्ठानात गेले असता त्यांनी शिलाई मशिन घेतल्यानंतर प्रवीणकुमारला फोन करून साहित्याचे देयक चुकविण्याची विनंती केली. त्याने प्रतिष्ठानच्या मालकाच्या मोबाईलवर एक लिंक पाठविली. ती लिंक बघितली असता त्यावर क्रेडिट ऐवजी डेबिट असल्याचे प्रतिष्ठानच्या मालकाच्या लक्षात आले. त्यांनी लगेच पाटील यांना सावध केले. याच भामट्याने जनता डिपार्टमेंटलच्या मालकालाही फोन करून अशीच फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी थेट संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केल्याने फसवणूक टळली. हा कुणी मदत करणारा नसून, मदतीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणारा भामटा असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पाटील यांनी थेट खदान पोलिस स्टेशन गाठून पोलिस तक्रार दाखल केली.
……………………
संस्थांना मदत करण्याच्या नावाखाली फसवणूक करण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळे सूर्योदय बालगृहाच्या नाखाली कुणी मदत करण्यासाठी ऑनलाईन पैसे देण्यासाठी लिंक पाठविल्यास त्याला प्रतिसाद देवू नये.
– नंदकिशोर खंडाळकर, प्रकल्प संचालक, सूर्योदय बालगृह, अकोला
………………………
ऑनलाईन व्यवहाराच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. कोणत्याही प्रकारे ऑनलाईन व्यवहार करताना सावध राहणे आवश्यक आहे. कुणालाही ओटीपी देवू नका. अनोळखी नंबरवरून आलेले व्हिडीओ ओपन करू नका. बँकां कुणालाही फोन करून खात्याची माहिती मागत नाही. थेट बँकेत जाऊन विचारणा करा.
– श्रीरंग सनस, पोलिस निरीक्षक, खदान पोलिस स्टेशन

Leave a Comment