प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी अकोला मनपाची कार्यशाळा: पर्यावरण दिन 2025 निमित्त विशेष उपक्रम
अकोला, दि. 28 मे 2025 — प्लास्टिक प्रदूषणाचा वाढता धोका लक्षात घेता, अकोला महानगरपालिका प्रशासनाने जागतिक पर्यावरण दिन 2025 च्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 22 मे ते 5 जून 2025 दरम्यान राबविण्यात येणाऱ्या “प्लास्टिक प्रदूषणाच्या निर्मूलनाचे महत्त्व” या विशेष मोहिमेअंतर्गत, अकोला मनपात आज प्लास्टिक बंदी व पर्यावरण संरक्षणावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
ही कार्यशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहात पार पडली. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनिल लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वच्छ महाराष्ट्र अभियानचे जिल्हा तांत्रिक तज्ज्ञ आशिष व-हाडे होते. त्यांनी प्लास्टिकचा पर्यावरणावर होणारा घातक परिणाम, रियुज व रिसायकल यांचे महत्त्व, आणि शासनाने बंदी घातलेल्या सिंगल यूज प्लास्टिकच्या पर्यायी उपाययोजनांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वच्छता विभाग प्रमुख संजय खोसे यांनी प्रास्ताविक केले. पर्यावरण अधिकारी अनिल बिडवे यांनी कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन केले. कार्यशाळेत चारही झोनचे सहायक आयुक्त विठ्ठल देवकते, दिलीप जाधव, देविदास निकाळजे, राजेश सरप यांच्यासह विविध विभागप्रमुख, अधिकारी व स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेत प्लास्टिक कॅरीबॅग ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. नागरिकांनी प्लास्टिक बंदीबाबत जागरूक होऊन पर्यावरण पूरक सवयी आत्मसात करण्याचा संदेश दिला गेला.
मनपा प्रशासनाने अकोलावासीयांना आवाहन केले की, त्यांनी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर त्वरित बंद करून पर्यावरण रक्षणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलावे. शासनाने घालून दिलेले प्लास्टिक बंदीचे नियम काटेकोरपणे पाळावेत आणि मनपाच्या या मोहिमेस सहकार्य करावे.