अकोल्यात वादळी वाऱ्याचा कहर!

अकोल्यात वादळी वाऱ्याचा कहर! मनपा यंत्रणा २४ तास एक्शन मोडवर – झोन व आपत्ती व्यवस्थापन टीम सज्ज

अकोला बातम्या Breaking News News नागरी सुविधा पर्यावरण / स्वच्छता पाणी शहर बातम्या (अकोला) → मनपा बातम्या शेती व हवामान

 

अकोला शहरात २७ मे रोजी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा कहर, अनेक ठिकाणी झाडे कोसळली व सखल भागात पाणी साचले. मनपा आयुक्त डॉ. लहाने यांच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा २४ तास एक्शन मोडवर.

अकोला, दि. २७ मे:
शहरात आज संध्याकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यांनी आणि मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, रस्त्यांवर पाणी साचले, तर काही भागात नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने रहदारीस अडथळा निर्माण झाला.

या नैसर्गिक आपत्तीतून नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनिल लहाने यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला २४ तास एक्शन मोडवर ठेवण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर झोन कार्यालये, मोटर वाहन विभाग, स्वच्छता विभाग व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे.

वादळी वाऱ्यामुळे कोसळलेली झाडे तातडीने बाजूला करून वाहतुकीला मार्ग करून देण्यात आला. जेसीबी मशीनच्या मदतीने मोठ्या नाल्यांची सफाई करून साचलेले पाणी बाहेर काढण्यात आले. काही सखल भागात घरांमध्ये पाणी शिरले असल्याने तातडीने पंप लावून पाण्याचा निचरा करण्यात आला.

आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून शहरात गस्त सुरू असून नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ कारवाई केली जात आहे. याशिवाय हेल्पलाइन नंबरद्वारे मदतीचे कॉल्स घेऊन संबंधित झोन कार्यालयांना तत्काळ सूचना देण्यात येत आहेत.

शहरात अजूनही पावसाचे वातावरण असून मनपा प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, तसेच गरज असल्यास मनपाच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *