आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत सर्व यंत्रणांना एकसंघ काम करण्याचे आवाहन
अकोला – अकोल्यात मंगळवारी झालेल्या पूर्वमोसमी अवकाळी पावसाने शहराची अवस्था दयनीय झाली असून नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर अकोला पश्चिमचे आ. साजिद खान पठाण यांनी बुधवारी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश दिले.
या बैठकीस मनपा आयुक्त सुनील लहाने, उपायुक्त गीता ठाकरे, नायब तहसीलदार महेंद्र आत्राम तसेच महावितरण, आरोग्य विभाग, मनपा यंत्रणा व अन्य संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आ. पठाण यांनी या बैठकीत सांगितले की, “आपल्याकडे यंत्रणा असूनही नागरिकांचे हाल होतात, हे दुःखद आहे. आपत्कालीन कक्षाचा क्रमांक सार्वजनिक करावा, झोननिहाय आणि प्रभागनिहाय अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करावेत. नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करून पीडित नागरिकांना शासकीय मदत मिळवून द्यावी.”
शहरात विविध भागांमध्ये पाणी साचल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसले. मोहता मिल परिसरात झाड कोसळून चारचाकी वाहनावर पडल्याची घटना घडली, सुदैवाने महिला व बालक सुखरूप बचावले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काळात जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे प्रशासनाने सज्ज राहावे, असेही त्यांनी सांगितले.
महावितरणच्या ढिसाळ नियोजनावरही आ. पठाण यांनी टीका केली. “जर कार्यात गती न आणल्यास आगामी अधिवेशनात मेंटेनन्सच्या नावाखाली खर्च झालेल्या निधीचा हिशोब मागण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला. यावेळी पंकज गावंडे, मोहम्मद इरफान, मोईन खान, रवी शिंदे, योगेश कळसकर, जावेद जकारिया आदी उपस्थित होते.
नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा
रविवारी झालेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये नागरिकांचे घरांचे टिनपत्रे उडाले, झाडे कोसळून नुकसान झाले. आ. पठाण यांनी या सर्व भागांचे तात्काळ पंचनामे करून संबंधितांना शासकीय मदत देण्याचे निर्देश दिले.
“मी जनतेचा सेवक” – आ. पठाण यांची रोखठोक भूमिका
“मी जनतेचा सेवक आहे. जनतेला होणारा त्रास खपवून घेणार नाही. सर्व अधिकारी एकत्र येऊन एकसंघपणे कार्य करावे, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल,” तर जनतेच्या पैशावर आपण अधिकारी पदाच्या सर्व सोयीसुविधा उपभोगत आहोत, जर जनतेलाच असुविधा झाल्या तर आपणाला खुर्चीवर बसू देणार नाही, असा स्पष्ट इशारा आ. पठाण यांनी यावेळी दिला.
पाणी साचलेल्या भागांची यादी
गंगा नगर, भारत नगर, नायगाव, कौलखेड, खडकी, खैर मोहम्मद प्लॉट, रायली जीन, डाबकी रोड, नायगाव, अकोट फाईल, खदान शिवसेना वसाहत, अयोध्या नगर, सोनटक्के प्लॉट, रामदास पेठ आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः त्या भागात जाऊन पाहणी करून त्वरित निचऱ्याची व्यवस्था करावी, असे आदेश देण्यात आले.