घरोघरी तिरंगाः पोलिस विभागातर्फे जनजागृती मॅरेथॉन रॅली

घरोघरी तिरंगाः पोलिस विभागातर्फे जनजागृती मॅरेथॉन रॅली

अकोला :  ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानाच्या जनजागृतीसाठी आज अकोला शहरातील प्रमुख मार्गांवरुन पोलिस विभाग व होमगार्डचे महिला व पुरषांनी मॅरेथॉन स्पर्धा रॅलीद्वारे प्रचार केला. या रॅलीला पोलिस अधिक्षक जी. श्रीधर व अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली.

पोलिस मुख्यालयापासून आज सकाळी सात वा. मॅरेथॉन रॅली सुरु झाली. यामध्ये अकोला पोलीस दलाचे अधिकारी, महिला पोलीस अंमलदार, पुरुष अंमलदार, माजी सैनिक, तसेच महिला व पुरुष होमगार्ड सैनिकांचा सहभाग होता. यावेळी प्रभारी पोलीस उपअधीक्षक गृह नितीन शिंदे, राखीव पोलीस निरीक्षक श्रीधर गुलसुंदरे, क्रीडा प्रमुख रवी ठाकूर, कवायत प्रशिक्षक सत्तार, शेषराव ठाकरे, कुंदन इंगळे, आसिफ सिद्धीक, उमेश सानप, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी पोलीस निरीक्षक आदी उपस्थित होते.

ही रॅली पोलीस मुख्यालयासमोरुन निघून जेल चौक, बस स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन चौक, अकोट स्टॅण्ड कोतवाली मार्गे पोलीस मुख्यालय येथे मॅरेथॉन रॅलीचा समारोप करण्यात आला. या मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटातून प्रथम क्रमांक होमगार्डचे सैनिक राहुल आनंदराव मोडक, द्वितीय क्रमांक पोलीस विभागाचे अंमलदार गणेश भागवान कुहिले, तृतीय क्रमांक होमगार्डचे सैनिक उमेज सीताराम उंबरकर, तर महिला गटातून महिला होमगार्ड सैनिक प्रीती बावस्कर, द्वितीय क्रमांक पूजा धोंडूजी डाबेराव व तृतीय क्रमांक मेघा भगवान भारसाकळे यांनी पटकावला. तसेच प्रोत्साहनपर पोलीस अंमलदार देवीदास पाडोरे, पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे, राखीव पोलीस उपनिरीक्षक गोविंद साबळे, कवायत प्रशिक्षक उमेश सानप यांना पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या हस्ते सर्व विजेत्याना मेडल देऊन सन्मानित केले.

Leave a Comment