विजय जानी यांच्या जीवावर उठलेले ‘मास्टरमाईंड’ कोण? : विजय मालोकार

Spread the love

विजय जानी यांच्या जीवावर उठलेले ‘मास्टरमाईंड’ कोण? : विजय मालोकार

होमिओपॅथी एज्युकेशन सोसायटी’ची जमीन विक्रीस विरोध करणाऱ्या विजय जानी यांच्या जीवावर उठलेले ‘मास्टरमाईंड’ कोण? : विजय मालोकार

अकोला शहराच्या मध्यभागी म्हणजेच गोरक्षण मार्गावर असलेली 10 एकर जागा जी होमिओपॅथी कॉलेजसाठी प्रस्तावित असतांना ही होमिओपॅथी एज्युकेशन सोसायटी’ची ही 10 एकर जागा सोसायटीने विक्रीला काढली आहे.जमीन विक्रीची निविदा काढून भूमाफिया, राजकारणी सह काही अधिकाऱ्यांनी ही जागा घशात घालण्यासाठी मोठा कट रचला आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
शहरात सर्वाधिक महागडी जमीन असलेल्या भागांपैकी गोरक्षण रोड हा भाग समजला जातो. ही जमीन बेकायदेशीरपणे विकण्याला संस्थेच्या विश्वस्त मंडळातील विजय जानी यांनी तीव्र विरोध दर्शविला होता. ही जमीन घशात घालण्यासाठी बेकायदेशीरपणे विक्री प्रक्रिया राबविण्याच्या संस्थेच्या प्रयत्नाविरुद्ध जानी यांनी सदैव आवाज उठवला आहे.
मात्र, जमीन विक्रीला विरोध करू पाहणाऱ्या विजय जानी यांना विविध प्रकारे अडचणीत आणण्याचा प्रयत्न संचालक मंडळ आणि ही जागा घशात घालू पाहणाऱ्यांनी सुरू केला आहे. यातूनच जानी यांच्यावर कोणताही संबंध नसताना एका खोट्या तक्रारीच्या माध्यमातून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ते विजय मालोकार यांनी केला आहे.

यासोबतच गेल्या काही दिवसांपासून जानी कुटुंबीयांना सातत्याने धमकावण्याचे प्रकारही समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी जानी यांच्या कुटूंबियांच्या चार चाकी गाडीवर गोरक्षण रोडवर दगडफेक करण्यात आली होती. जानी यांचे सून आणि नातू यावेळी या गाडीत होते. संस्था घशात घालू पाहणारे या मार्गात अडचण ठरत असलेल्या विजय जानी यांच्यावर विविध माध्यमातून दबाव आणत असल्याचा आरोप विजय मालोकार यांनी केला आहे. या सर्व लोकांपासून विजय जानी यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा मालोकार यांनी व्यक्त केला आहे विजय जानी यांच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार हे संचालक मंडळ आणि ही संस्था घशात घालू पाहणारे मास्टरमाईंड राहणार असल्याचा इशारा यावेळी विजय मालोकार यांनी दिला आहे ‌.

विजय मालोकार यांनी उपस्थित केलेले प्रश्न 

‘होमिओपॅथी एज्युकेशन सोसायटी’ला हाताशी धरून गोरक्षण मार्गावरील दहा एकर जागा अगदी कवडीमोल भावात आपल्या घशात घालण्याचा प्रयत्न अकोला, वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्यातील काही राजकीय नेते, भूमाफिया, दलाल यांनी सुरू केला आहे. या संपूर्ण बेकायदेशीर विक्रीला संस्थेचे विश्वस्त विजय जानी आणि अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ते विजय मालोकार यांनी सातत्याने विरोध केला आहे. संस्थेतील काही लोकांना हाताशी धरून पैशाचे व्यवहार करीत ही जागा विक्रीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचा आरोप अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ते विजय मालोकारांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी सरकार, जिल्हाधिकारी आणि विभागीय सहायक धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. सध्या 200 कोटी बाजारभाव असलेली ही जागा फक्त 50 ते 60 कोटींत विकण्याचा घाट घातला जात आहे. शहरात स्वत:ची जागा असतांना सध्या संस्थेद्वारा चालवलं जाणारं ‘होमिओपॅथी कॉलेज’ अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर एका भाड्याच्या इमारतीत चालवलं जात आहे.. शहरातील अगदी मोक्याच्या जागेवर असलेले ही जमीन विकताना संस्थेच्या हेतू बद्दल विजय मालोकारांनी अनेक प्रश्न उपस्थित करत शंका घेतली आहे

.
#संस्थेमध्ये प्रचंड गैरव्यवहार असून संस्थेच्या उद्देशाला अनुसरून कार्य करण्याऐवजी संस्थेतील काही पदाधिकारी काही विशिष्ट व्यक्तींशी संपर्क करून कोट्यावधी रुपयांचा भूखंड कवडीमोल भावात विकण्याचा प्रयत्न का करीत आहेत?.
# संस्था व्यवस्थित चालविण्याकरिता संस्थेचे मूळ उद्देश पूर्ण करण्याकरिता संस्थेतील विजय जानी वगळता इतर कोणताही विश्वस्त आणि संचालक प्रयत्न करताना दिसत नाही?..
# संस्थेच्या मालकीचे इतर भूखंड असतांना हाच भूखंड विकण्याचा आग्रह करण्याचे कारण काय.
# संस्थेचे काही सभासद संस्थेच्या गैरव्यवहाराबाबत न्यायालयात दाद मगण्याच्या तयारीत असून ते आपल्या संपर्कात असल्याचा दावा विजय मालोकार यांनी व्यक्त केला आहे..
# लहान प्लॉट करून जागा विकण्याऐवजी संपूर्ण जागाच एकराच्या भावाने एकाच व्यक्तीला विकण्याचा अट्टाहास का?.
# संस्थेने महाविद्यालय बांधण्यासाठी राखीव ठेवलेली जागा विकण्याचा घाट का अणि कुणाच्या म्हणण्यानुसार घातला जातोय?.
# निविदा प्रकाशीत करतांना त्यात विक्री चौरस फुटांऐवजी एकराने करणार असल्याचं का नमुद केलं गेलं?. जर असं करायचे होते तर महापालिकेकडून तात्पुरता लेआऊट नकाशा का मंजूर केला गेला?.
# निविदेत जमिनीची मुळ किंमत का लिहिली गेली नाही?.
# काही निविदा आल्या असतांना त्या जाणीवपुर्वक का स्वीकारल्या गेल्या नाहीत?.
# हे सर्व करीत असतांना प्रत्येक ठिकाणी आवश्यक असलेल्या धर्मदाय आयुक्तांच्या परवानग्या वेळोवेळी घेण्यात आल्यात का?.

विजय जानी यांच्या जीवाला भूमाफियांपासून धोका. सरकारने त्यांना संरक्षण द्यावे : विजय मालोकार

या संपूर्ण गैरव्यवहाराला आधीपासूनच संस्थेचे विश्वस्त आणि या जमिनीचे मूळ मालक असलेले विजय जानी यांनी प्राणपणाने विरोध केला आहे. संस्थेतील विरोध करणाऱ्या काही संचालकांना जमीन बळकाऊ पाहणाऱ्या मास्टरमाइंडनी विविध प्रलोभन आणि आमिषं दाखवत आपल्या बाजूने करून घेतले आहे. त्याच माध्यमातून ही संपूर्ण जागा आपल्या घशात घालण्याचा डाव या सर्वांनी आखला आहे. विरोध करणाऱ्या विजय जानी यांना विविध माध्यमातून धमक्या, त्रास देत त्यांना विरोध करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न संबंधित लोक करत असल्याचा आरोप विजय मालोकार यांनी केला आहे एका खोट्या गुन्ह्यात जानी यांना अडकवत त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न अकोल्यातील काही लोकांच्या माध्यमातून सुरू असल्याचा दावा विजय मालोकारांनी केला आहे याबरोबरच जानी यांच्या कुटुंबीयांच्या वाहनावर नुकतीच काही अज्ञात लोकांनी दगडफेक केली होती़़.याचे मास्टर माइंडही हेच लोक असल्याचा आरोप मालोकारांनी केला आहे विजय जानी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला या लोकांपासून धोका असून सरकारने त्यांना संरक्षण द्यावं, अशी मागणी विजय मालोकार यांनी केली आहे.

होमिओपॅथी महाविद्यालया’ची जागा खाजगी बिल्डरांना विकण्याचा संस्थेचा डाव 

शहरात चांगलं आणि अद्ययावत होमिओपॅथी महाविद्यालय असावं असं अकोला येथील ‘होमिओपॅथी एज्युकेशन सोसायटी’ला वाटत होतं. त्याच अनुषंगाने 1959 सालाच्या काही काळ आधी ही सोसायटी स्थापन करण्यात आली. यातूनच तेंव्हाच्या माजी विश्वस्तांनी अकोला शहरातील गोरक्षण मलकापूर मार्गावर 1959 मध्ये एक जागा नाममात्र मोबदल्यात विकत घेतली. मौजे मलकापूर येथे शेत सर्व्हे नंबर 13 मधील 10 एकर जागा 31 मार्च 1959 मध्ये विकत घेतली गेली. वैद्यकीय शिक्षणाच्या उदात्त हेतूने जागेचा वापर होत असल्याने शिवशंकर जानी या दानशूर व्यक्तीने तेंव्हा अगदी नाममात्र दरात आपल्या 10 जागेची खरेदी या संस्थेला खरेदी करून दिली. ही जागा त्याकाळी मुख्य शहरापासून काहीशी दुर होती. ही 10 एकपेक्षा अधिक असलेली जागा 4 लाख 34 हजार 865 चौरस फुट म्हणजेच 4 हेक्टर 4 आर एव्हढी आहे.

या जागेत होमिओपॅथी महाविद्यालय आणि यामध्ये विद्यार्थ्यांना लागणाऱ्या मूलभूत सोयी-सुविधा, मुलांचे वस्तीगृह, रुग्णालय आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान व इतर बाबींची पूर्तता करण्यासाठी नियोजन करून ठेवले होते. पुढे ही 10 एकर जागा पुढे ‘एकवीरा देवी मैदान’ नावाने ओळखली जाऊ लागली. मात्र, या जागेवर होमिओपॅथी महाविद्यालयाचं बांधकाम न झाल्याने ती तशीच मोकळी होती. गेल्या वीस वर्षांत अकोला शहराचा विकास आणि नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाले. यामुळे अतिशय उच्चभ्रू आणि महागडा भाग समजल्या जात असलेल्या गोरक्षण मार्गावरील ही 10 जागा शहराच्या अगदी मध्यात आली. या मैदानाच्या आजूबाजूला मोठमोठे बंगले, कॉम्प्लेक्स, गृहनिर्माण प्रकल्प उभे राहिलेत. त्यातूनच शहरासह अमरावती विभागातील काही भूमाफीया, राजकारणी आणि बिल्डर्स यांची नजर या जागेवर पडली. त्यातच आता ही जागा संस्थेच्या संचालक मंडळातील काहींना हाताशी धरून बळकावण्याचा घाट काही लोकांकडून घातला जातो आहे. ही जागा आता विकण्यासाठी ट्रस्टने जाहीर निविदा काढली आहे. सदर संस्था महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 अंतर्गत पंजीबद्ध आहे. या अधिनियमातील तरतुदीनुसार कोणत्याही जमिनीची व्यवहार करण्यापूर्वी किंवा त्याची लिलाव विक्री प्रकाशन करण्यापूर्वी धर्मदाय आयुक्तांची परवानगी घेणे गरजेचे आहे. या संस्थेने सदर परवानगी मिळवलेली आहे किंवा नाही याचे स्पष्टीकरण दिलेले नाही.

निविदा काढतांना नियम बसवलेत धाब्यावर 

या 10 एकर जागेची निविदा काढतांना त्यात मोठ्या प्रमाणात त्रृटी ठेवत गोंधळ घालण्यात आला आहे. मुळात या संपुर्ण 10 एकर जमिनीला अकृषक करतांना त्याचा तात्पुरता ‘लेआऊट नकाशा’ महापालिकेकडून मंजूर करण्यात आला आहे. हे करीत असतांना धर्मदाय आयुक्तांची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, निविदा काढतांना सर्वच नियम धाब्यावर बसवले गेलेत. निविदा प्रक्रियेत जागेचा ‘लेआऊट नकाशा’ मंजूर झालेला असतांना विक्री मात्र एकरानुसार करणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. येथील जागेचे भाव सध्या सरकारी रेडीरेकनरनुसार 14 हजार 50 रूपये प्रति चौरस मीटर आहे. मात्र, प्रत्यक्षात येथील बाजारभाव 20 ते 25 हजार रूपये प्रतिचौरस फुट आहे. त्यातच निविदेत जागेचा प्रस्तावित भावच नमूद न केल्याने ट्रस्टने जागेची किंमत किती ठेवली?, हे स्पष्ट होत नाही. निविदा दाखल करतांना मालमत्तेच्या नमूद किंमतीच्या 10 टक्के रक्कम अमानत रक्कम म्हणून भरावी लागते. त्यामूळे मूळ किंमत निविदेत टाकली नसल्याने आलेल्या निविदा फेटाळण्याचा ‘चोर दरवाजा’ ट्रस्टने उघडा ठेवला का?, असा प्रश्न विचारला जात असल्याची माहिती विजय मालोकार यांनी दिली.

जागा विक्रीच्या निर्णयापासून ‘ट्रस्ट’चे अनेक सदस्य अनभिज्ञ

या जागा विक्रीचा निर्णय ‘अकोला होमिओपॅथी एज्युकेशन सोसायटी’ या ट्रस्टमधील सर्व विश्वस्थांच्या एकमताने घेतला गेल्याचा दावा ट्र्स्टच्या अध्यक्ष-सचिवांकडून केला जात आहे. मात्र, यात काहीच सदस्यांना हाताशी धरून हा व्यवहार होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 1959 मध्ये नाममात्र दरात जागा देणारे जानी कुटुंबियांचे सदस्य आणि ‘ट्र्स्ट’च्या विश्वस्थांपैकी एक असलेले विजय जानी यांनी या संपुर्ण प्रकाराबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात संचालक मंडळाची कोणतीही बैठक झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ही संपुर्ण प्रक्रियाच बेकायदेशीर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

जागेवर भूमाफीया, राजकारणी आणि बिल्डरांचा डोळा

‘ट्रस्ट’च्या माध्यमातून ही जागा घशात घालण्याचा अनेकांचा डाव आहे. यात काही भूमाफीया, राजकारणी आणि बिल्डरांचा समावेश आहे. अमरावती विभागातील अकोला, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातील काही लोक या व्यवहारात गुंतल्याची चर्चा आहे. मोठे जनप्रतिनिधी, बड्या पक्षांचे मोठे पदाधिकारी या कटकारस्थानात सामिल असल्याची चर्चा अकोला शहरात आहे.

अकोल्यात सरकार, प्रशासनातील काही भ्रष्ट प्रवृत्ती आणि राजकीय नेत्यांच्या अभद्र युतीतून काही लँडमाफियांचा अक्षरश: उच्छाद सुरू आहे. शहरातील मोक्याच्या अनेक जागा या लोकांनी गिळंकृत केल्या आहेत. याला विरोध करू पाहत असलेल्या लोकाना विविध माध्यमातून त्रास देत, धाकदपटशा करीत त्यांना आयुष्यातून उठविण्याचे प्रयत्न अगदी राजरोसपणे सुरू आहे. राज्यात आणि देशात ‘रामराज्य’ आल्याचा दावा एकीकडे होत असतांना अकोल्यातील या ‘रावणी प्रवृत्तीं’ना सरकार अभय का देत आहे?, हा प्रश्न आता सर्वसामान्य अकोलेकरांना पडला असून विजय मालोकार यांनी ही माहिती दिली आहे.

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *